Tuesday, November 8, 2016

सीताफळ रबडी


 

भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्त्व आहे. भारतीय माणूस मुळातच उत्सवप्रिय आहे. आजच्या आधुनिक काळातही आपण पूर्वापार चालत आलेले सण, परंपरा पाळून आपली संस्कृती जपण्याचे काम करत असतो. मात्र, आता आधुनिक काळानुसार जुन्या परंपरांमध्ये बदल व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी विशिष्ट सण, उत्सव करण्यामागे काही कारणं होती. काहीवेळा धार्मिक, काही वेळा शास्त्रीय कारणं त्यामागे जोडलेली होती. त्यावेळी लोकांचे प्रबोधन ही सोपी आणि आजच्या एवढी सुलभ गोष्ट नसल्यामुळे, सण, उत्सवांच्या माध्यमातून तो उद्देश साध्य केला जात असे. दसऱ्याच्या सणालाही असेच अनेक अर्थांनी महत्त्व आहे. याच दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. सीमोल्लंघनाचा दिवस म्हणूनही विजयादशमीचा सण साजरा केला जातो. प्राचीन काळी सीमोल्लंघन म्हणजे युद्धमोहिमेवर निघण्याचा दिवस, असा अर्थ होता. आधुनिक काळात तो बदलून त्याचा नवा अर्थ लावता येईल. उदाहरणार्थ, कधीही पार्टी न देणाऱ्या आपल्या ग्रुपमधल्या एखाद्या मित्राला हेरावे. दसऱ्याच्या दिवशी सुटी असणारच, त्यामुळे सगळ्यांनी आधीच नियोजन करून ठराविक वेळी एकत्र यावे. तो मित्र घरी असल्याची खात्री करून घ्यावी. त्याला आपल्या योजनेबद्दल ताकास तूर लागू देऊ नये. शक्य तेवढे सगळे मित्रमैत्रिणी गोळा करावेत आणि दसऱ्याला सीमोल्लंघन करून ऐन जेवणाच्या वेळी त्याच्या घरी घुसावे. ऐनवेळी मित्र आल्यानं तो चक्रावून जाईल, पण सणाचा दिवस असल्यामुळे त्याला कुणाशी वाईट बोलता येणार नाही. सहजच आल्याचा बहाणा करून वहिनींना विश्वासात घ्यावे, त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवावे. त्यांचे गुणगान करावे. जेवणाचीच वेळ असल्याने आणि स्वयंपाकघरातून सुग्रास भोजनाचे विविध वास येत असल्याने, घरी ठाण मांडून बसावे. `आता जेवूनच जा,` हे अमृतबोल मित्राच्या नाही, पण निदान वहिनींच्या तोंडून ऐकल्याशिवाय त्यांच्यावरचा स्तुतिसुमनउधळण कार्यक्रम अजिबात खंडित होऊ देऊ नये. सीताफळ रबडीसारख्या मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर अन्नदात्याला सुखी होण्याचे आशीर्वाद देऊनच घराबाहेर पडावे. दुसऱ्या दिवशी आफिसातल्या सर्व मित्रपरिवाराला आणि फेसबुक मित्रपरिवाराला ही खबर दिल्याशिवाय हे व्रत सुफळ संपूर्ण होत नाही, याचा विसर पडू देऊ नये. तथास्तु!

साहित्य
 -१ लिटर दूध
- पाव वाटी साखर
- १/२ चमचा दूध मसाला
किंवा
- वेलची-जायफळ पूड, आवडीनुसार ड्रायफ्रुटस् चे काप
- दोन वाट्या सीताफळाचा गर (सीताफळाच्या बिया काढून गर काढून घ्या.)

पाककृती: 
1)   १ लिटर दूध जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर ठेवा.
2)   दूध अधूनमधून ढवळत रहा. साधारण निम्मे झाले की साखर आणि दूध मसाला घालून ढवळा. १० मिनिटे उकळी आणून गॅस बंद करा.
3)   दुसर्‍या पातेल्यात हे आटवलेले दूध काढून घ्या आणि थंड होऊ द्या. रबडी तयार होईल.
4)   थंड झालेल्या रबडीत सीताफळाचा गर मिसळून छान ढवळून घ्या.
फ्रीज मधे ठेवून गार करा.
(रबडी अजून घट्ट हवी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर थोड्या दुधात मिसळून घालावी.)

उपासाचे गुलाबजाम


फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करत होता. राजा मनानं खूप चांगला आणि कर्तव्यदक्ष होता. प्रजेवर राजाचं अतोनात प्रेम होतं. प्रजेचं राजावर अतोनात प्रेम होतं. राजाला दोन राण्या होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती. आवडत्या राणीला एक मुलगा होता. त्याचं नाव विक्रम. नावडत्या राणीला मुलगी होती, तिचं नाव होतं सुलोचना. सुलोचनाला लहानपणापासूनच चष्मा होता. सगळे तिची चेष्टा करत. तिला कुणी खेळायला घेत नसे. तिला कुणी आपलं म्हणत नसे. राजाला तिचं दुःख कळत होतं, पण वळत नव्हतं. आवडत्या राणीनं राजाला तिच्या ताब्यात ठेवलं होतं. विक्रम हाच राज्याचा वारसदार व्हावा, असं तिला वाटत होतं. त्यासाठी ती राजाला दुसऱ्या राणीबद्दल आणि तिच्या मुलीबद्दल विचारच करू देत नव्हती. नावडती राणी असेच दिवस कंठत होती. आपल्या मुलीला समजावत होती, की एक ना एक दिवस आपल्याला नक्की न्याय मिळेल. आपला भाग्योदय होईल. सुलोचनाला चष्मा असला, तरी ती सगळ्या कामांमध्ये तरबेज होती. स्वयंपाक तर एवढा उत्तम करायची, की तिच्या हातचं खाणारा माणूस बोटं चाटल्याशिवाय जेवण संपवतच नसे. असेच दिवस चालले होते. राज्यात आनंदीआनंद होता. नावडती राणी आणि सुलोचना सोडून बाकी सगळे खूश होते. मात्र या आनंदावर अचानक विरजण पडावं, तसं पडलं. एके दिवशी एक राक्षस त्या राज्यात आला आणि तो सगळ्या प्रजेला छळू लागला. सगळे लोक राजाला शरण आले आणि या संकटातून वाचवण्याची त्याला विनंती करू लागले. राजाला पेच पडला. आवडतीनं ताबडतोब तिच्या पुत्राला आज्ञा केली, की या राक्षसाशी युद्ध कर. विक्रमानं युद्ध केलं, पण तो पराभूत झाला. राक्षस राजाला म्हणाला, राजा, मी तुझं राज्य सोडून जाईन. पण एका अटीवर. राजा म्हणाला, कुठली अट? राक्षस म्हणाला, आज माझा उपास आहे. तू मला उपासाचा एखादा भन्नाट पदार्थ खायला घातलास आणि मी तृप्त झालो, तर मी हे राज्य कायमचं सोडून जाईन. राजा पुन्हा काळजीत पडला. उपासाचा कुठला पदार्थ या राक्षसाला खायला घालायचा? तो नावडतीकडे आला. तिच्यासमोर सगळी कहाणी त्यानं सांगितली. नावडतीनं विश्वासानं तिच्या मुलीवर ही जबाबदारी सोपवली. सुलोचनानं आनंदानं ती जबाबदारी घेतली आणि एक वेगळाच पदार्थ तयार केला. त्याचं नाव उपासाचे गुलाबजाम. राक्षसानं ते खाल्ले आणि त्याला ते प्रचंड आवडले. सुलोचनाचं कौतुक करून, सगळ्या प्रजेची माफी मागून तो कायमचा त्या राज्यातून निघून गेला. तर त्या राजकन्येनं केलेला हा खास पदार्थ आपल्यासाठीही. उपास सोडताना आपल्या पोटातल्या भुकेच्या राक्षसाला शांत करण्यासाठी!

 
साहित्य:
§  ५०० ग्रॅम खवा
§  १ वाटी भगर पीठ
§  6 वाट्या साखर
§  चिमूटभर खायचा सोडा
पाककृती
1)   खवा पुरणयंत्रातून काढणे. नंतर त्यात भगर पीठ घालून मळणे.
2)   दोन तास बाजूला ठेवून देणे. 2 तासाने, गुलाबजाम अगदी तळायच्या आधी चिमूटभर खायचा सोडा मिश्रणात घालून पीठ चांगले मळून घेणे. खूप सैल वाटलं तर भगर पीठ अंदाजाने वाढवणे.
3)   छोटे छोटे गोळे करून तुपात तळणे
4)   6 वाट्या साखरेत 4 वाट्या पाणी घालून कच्चा पाक करून घ्या.
5)   त्यात वेलची पूड घाला.
6)   वरील तुपात तळलेले गोळे पाकात टाका.
7)   गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.

गोळे तळल्यानंतर ते गरम लगेच पाकात घालू नयेत. आधी कागदावर काढून घ्यावेत. दुसरे तळून झाले कि पहिले तेलातील काढलेले गोळे पाकात घालावेत.


Saturday, November 5, 2016

व्हेज कटलेट

कल्पना करा की, छान पावसाळी हवा आहे. नभ मेघांनी आक्रमलेलं आहे. आपल्याला सुट्टी आहे आणि आज बायकोनं ठरवलेल्या शॉपिंगच्या बेतावर पाणी पडलं आहे. बाहेर कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. घरी पाहुणे अचानक येऊन टपकण्याचं संकटही नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. टीव्हीवर आज आपल्या बायकोची, आईची, मुलीची, बहिणीची, कुठलीच आवडती सिरियल नाहीये. उलट, आपल्या आवडीचा सिनेमा (`सूर्यवंशम` सोडून कुठलाही!) लागला आहे. आजूबाजूला कुठलाही सण, उत्सव, समारंभ, वाढदिवस, निवडणूक, मिरवणूक, काही काही नसल्यामुळे डीजेही लागलेला नाहीये. हवेत एक मंद, कुंद गारवा आहे. जवळपास गुलाबी का कशी म्हणतात ती थंडी पडलेली आहे. आपल्या गॅलरीतून समोर दिसणारा निसर्ग अक्षरशः वेड लावतोय. बॉसनं अचानक फोन करून उद्या सकाळीच कुठलंही काम करण्याचं फर्मान सोडलेलं नाहीये. व्हॉटस अप ग्रुपवर कुठल्याही गहन विषयावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. तुम्ही छान (चहाचेच!) घुटके घेत पाऊस बघत बसला आहात. अशावेळी तुमची बायको गरमागरम बटाटा-मटारवडा (म्हणजे व्हेज कटलेट!) आणून तुमच्यासमोर ठेवते! (बटाटावडा हे आपलं राष्ट्रीय खाद्य असल्यामुळे, व्हेज कटलेटला बटाटा-मटारवडा म्हटलं, की देशभक्ती आणखी वाढते, असं म्हणतात.) समोर ते गरमागरम पदार्थ पाहून तुमचा आनंद द्विगुणित होतो, जन्माचं सार्थक झाल्याचा फील तुम्हाला येतो आणि तुम्ही तिच्याकडे अत्यंत आदरानं, प्रेमानं, भरल्या डोळ्यानं पाहत राहता....! ती लाजते आणि म्हणते, ``अहो, काय बडबडताय? कुणी केलंय व्हेज कटलेट? जरा स्वप्नातून भानावर या!`` तात्पर्य : हे स्वप्न साकार करायचं असेल, तर एकतर बायकोला कायमच आदर, प्रेम, सन्मान द्या, तुम्ही स्वतः तिच्यासाठी एखाद्या वेळी अशा प्रकारचा सुखद धक्का द्या, नाहीतर अशी स्वप्नच बघणं सोडून द्या.

 

साहित्य:
१ शिजलेला बटाटा, १/२ वाटी मटार, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी फरसबीचे तुकडे, १ छोटा कांदा, १ टी स्पून लसूण पेस्ट, ५ टी स्पून हरभरा डाळीचे पीठ, ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट, १ टी स्पून गरम मसाला, १ टी स्पून चाट मसाला, १ टी स्पून आमचूर पावडर, १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १/४ वाटी भाजलेला रवा किंवा ब्रेडक्रम्स, 2 चमचे मैद्यामध्ये 4 चमचे पाणी घालून केलेले मिश्रण, तेल, मीठ.

पाककृती: मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल. नॉनस्टिक फ्राइंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला कि त्यात चण्याचे पीठ घालावे, पीठ खमंग भाजून घ्यावे. शिजलेला बटाटा एका भांड्यात बारीक करून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले पीठ घालून एकत्र करावे. पीठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा आणि इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा. मिश्रणाचे समान भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावे. नॉनस्टिक फ्राइंग पॅनमध्ये १-२ चमचे तेल गरम करत ठेवावे. कटलेट मैद्याच्या पाण्यातून काढावे आणि नंतर कटलेटला भाजलेला रवा किंवा ब्रेडक्रम्स दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यावे.
पुदीन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे, किंवा आपण खावे!

 


Thursday, November 3, 2016

शेवयांचा उपमा

...तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. आत्ता उठतो, सांगून तो गादीत पुन्हा लुडकला आणि पाच मिनिटांची ५० मिनिटं कधी झाली, त्याचा त्यालाच पत्ता लागला नाही. तरीही मोठ्या धीरानं तो उठला. पुन्हा गॅसपाशी गेला. त्याने किचन ट्रॉलीमधून कढई काढली. गॅसवर ठेवली. त्याची नाश्त्याची वेळ झाली होती, पण काहीच तयार नव्हतं. `तू जा जिमला, मला सुट्टी आहे ना, मी बनवतो आज नाश्ता,` असं त्यानं बायकोला मोठ्या उत्साहानं सांगितलं होतं, पण आता प्रत्यक्ष रणसंग्रामाची वेळ आल्यावर त्याचं अवसान गळालं होतं. आळसाचा वेताळ त्याच्या मानगुटीवर बसला होता, पण त्याच्या गोष्टी ऐकत बसायला त्याला वेळ नव्हता. बायको यायच्या आत तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठी काहीतरी करणं भागच होतं. नाहीतर तिच्याकडून काय काय ऐकून घ्यावं लागलं असतं, याची कल्पनासुद्धा करता येण्यासारखी नव्हती. त्यातून नेहमीच्या पोहे-उपम्याच्या पलीकडचं काहीतरी करायचं होतं. त्याला आयत्या वेळी काही सुचेना. काय करावं कळेना. वेताळानं त्याची अवस्था पाहिली आणि त्यालाही दया आली. वेताळ म्हणाला, ``विक्रमा, तुझ्या या अनंत ध्येयासक्तीने मी प्रभावित झालो आहे, म्हणून मी तुला शेवयांच्या उपम्याची कृती सांगतो. ती नीट लिहून घे आणि सांगतो तसं कर. कृती समजूनही तू शेवयांचा उपमा केला नाहीस, तर बायको आल्यावर तुला एवढं काही सुनावेल, की त्या मारानं तुझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील आणि बायको वैतागून पुन्हा तुलाच तो सगळा पसारा आवरायला लावेल.`` तर मंडळी, वेताळानं सांगितलेली शेवयांच्या उपम्याची ही पाककृती खास आपल्यासाठीही...! बघा करून!!

साहित्य :
बारीक शेवयांचा चुरा 2 वाटी, शेंगदाणे/ हरभराडाळ/ उडिदडाळ, आले किसून, सुकलेल्या लाल मिरच्या 4 ते 5, तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, मीठ, कोथिंबिर


पाककृती :
-   
बेताचे पाणी उकळून घ्या. पाणी उकळेपर्यंत मंद आचेवर एका कढईत तेलावर शेवयांचा चुरा तांबूस, खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
-   
भाजल्यावर शेवया बाजूला काढून ठेवा. त्याच कढईत परत तेल गरम करा. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, लालमिरच्यांची फोडणी करा.
-   
डाळ किंवा शेंगदाणे आवडीनुसार घाला. परतलेल्या शेवया, मीठ घालून सर्व एकजीव करा. उकळलेले पाणी घालून चांगले हलवून झाल्यावर झाकण ठेवा. वाफ येऊन  मोकळा शिजवा. गरमगरम असतांना खा.

(आवडीनुसार कांदा घालावा. फोडणीत परतून घ्यावा.)

हराभरा कबाब

आटपाट नगर होतं. तिथे एक श्रीमंत माणूस राहत होता. घर संपन्न होतं, माणूस सुखी होता. एक बायको, दोन मुलं असा चौकोनी परिवार होता. अशा सुखी घरात राहत असलेल्या त्या माणसाच्या बायकोला मात्र एक खंत होती. आपल्याएवढंच सुखी, समृद्ध असलेलं आपल्या भावाचं घर तिनं मुलांना कधी दाखवलं नव्हतं. मुलांना घेऊन मामाच्या गावाला जाणं तिला कधी जमलंच नव्हतं. एका रविवारी तिनं बेत केला. गाडी काढून बाई मुलांना घेऊन माहेरी गेली. माहेरी जंगी स्वागत झालं. भावाला प्रचंड आनंद झाला. त्यानं बहिणीच्या स्वागताचा थाट उडवून दिला. तिच्यासाठी पंचपक्वान्नं शिजली. स्वतः भाऊ आपल्या बहिणीला आणि भाचरंडांना जेवण वाढण्यासाठी पुढे झाला. पण मुलांना जेवण आवडेना. ही भाजी कसली? बाळा, ही उसळ. हिरव्या मुगाची. ही चटणी कसली? ही चटणी पुदिन्याची. सगळं आपल्याच शेतातलं बरं. आईही रागावली. मुलांना दटावली. मुलं काही ऐकेनात. पानात वाढलेलं जेवेनात. आईनं मग युक्ती केली. जेवणाची पंगत थोडी पुढे ढकलली. भावाला म्हणाली, दादा तू उदास होऊ नकोस. घेतला वसा टाकू नकोस. मुलं हेच अन्न जेवतील, अगदी मिटक्या मारत. भाऊ चमकला. त्याला काहीच अंदाज नव्हता. बहिणीने मग पदर खोचला. सगळं साहित्य घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. मूग, पुदिना, पालक, बटाटे, सगळं तेच साहित्य वापरून तिनं `ग्रीन कबाब` बनवले. मुलांच्या ताटात वाढले. मुलांनी मिटक्या मारत खाल्ले. मुलांनो, आज एवढे लाड झाले. पण तुम्ही मघाशी जे नाकारले, तेच आत्ता खाल्ले. तेव्हा यापुढे उतू नका, मातू नका. अन्नाला नावं ठेवू नका. मुलं वरमली. मामाची माफी मागितली आणि सगळंच अन्न पोटभर जेवूनच पानावरून उठली. अशी ही हराभरा कबाबची हरीभरी कहाणी घरोघरी सुफळ संपूर्ण.


साहित्य : 


भिजवलेले हिरवे मूग 2 वाट्या, पुदीना पाने पाव वाटी, पालक 10 ते 15 पाने, दोन बटाटे, कॉर्नफ्लोअर 1 टेबलस्पून, आल्याचा दीड इंचाचा तुकडा, कच्चा मसाला अर्धा टी-स्पून, अर्धे लिंबू, लसूण 5 ते 6 पाकळ्या, हिरव्या मिरच्या 5 ते 6, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, ब्रेड चुरा 1 वाटी, तेल पाव वाटी, चवीनुसार मीठ


पाककृती :
मूग, पुदीना, पालक सर्व उकडून घ्यावे. त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा, आले, लसूण, मिरची वाटून घ्यावी, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. वरिल सर्व जिन्नस एकत्र करून त्यात मसाला, मीठ कॉर्नफ्लोअर घालावे. हे मिश्रण घट्ट मळून घेणे. त्यास हवा तसा आकार देऊन ब्रेडचुऱ्यात घोळवून तव्यावर शॅलोफ्राय करावे. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर खावेत.


#

मुगाचा इडली ढोकळा

मूग गिळून गप्प राहणे, हा वाक्प्रचार आपल्याला नवीन नाही. विशेषतः विवाहित पुरुषांना तर नाहीच नाही! तसंही बोलण्यापेक्षा आपण गप्प राहण्यालाच जास्त प्राधान्य देत असतो. मग ते खाजगी आयुष्य असो, किंवा सार्वजनिक. त्यासाठी मूग गिळण्याचीही आपल्याला गरज नसते. अनेकदा समोर घडणाऱ्या कुठ्लयाच गोष्टीबद्दल आपल्याला काही म्हणायचं नसतं. हा वाक्प्रचार मुळात कुठून आला, त्याची एक गोष्ट सांगितली जाते. पूर्वीच्या काळात विद्याभ्यास करणारे शिष्य, संन्यासी मंडळी यांच्यामध्ये माधुकरी अर्थात भिक्षा मागून मिळेल ते अन्न खाऊन गुजराण करण्याची परंपरा होती. त्यांना फक्त पाच घरांमध्ये भिक्षा मागण्यासाठी परवानगी असे. या पाच घरांतून जे मिळेल, तेच खाऊन राहायचं आणि सहाव्या घरी त्या दिवशी तरी जायचं नाही, असा दंडक असे. म्हणून माधुकरी मागणारे आपल्या जवळ मोड आलेली कडधान्यं ठेवत, जेणेकरून काहीच अन्न न मिळाल्यास त्या कडधान्यांमुळे तरी भूक भागत असे. यात अनेकदा मूग असत. त्यावरूनच मूग गिळून गप्प बसण्याचा वाक्प्रचार पडला असावा, असा अंदाज. अर्थात, मूग गिळून आपण गप्प बसत असलो, तरी पोटात गेल्यानंतर मूग काही गप्प बसत नाहीत. त्यांचे हितकारक उद्योग ते सुरू करतातच. मुगामध्ये ए, बी व्हिटामिन, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, हे उपयुक्त घटक असतात. कफ, पित्त आणि रक्तासंबंधी विकारात मूग अत्यंत उपयुक्त आहेत. मूग आणि मूगडाळीचे अनेक प्रकार होत असले, तरी आज आपण एक वेगळाच पदार्थ शिकूया, मूगडाळीची इडली कम ढोकळा. हा ढोकळ्यासारखाच ढोकळा, पण हरभरा डाळीपेक्षा पचायला सोपा आणि हलका. इडलीपात्रातही हा होऊ शकतो, म्हणून इडली ढोकळा. करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा.

साहित्य
१ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक, अर्धी वाटी कोमट पाणी , आलं, मिरची बारीक करून, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टे.स्पून तेल, हळद, पाव चमचा खाण्याचा सोडा, तेलाची फोडणी, साखर 1 चमचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ

कृती

- एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून भिजवून पातेल्यात 5 ते 6 तास झाकून ठेवावे.

- पीठ फुगून वर आले की त्यात आले, मिरची, मीठ, हळद, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा तेल घालावे.

- इडली पात्रात तळाला पाणी घालून गॅसवर ठेवावे, इडली पात्रातील ताटल्यांना तेल लावावे. पाण्याला उकळी आली की मिश्रणात सोडा घालून चांगले हलवून इडलीपात्रात ठेवावे. (पिठात सोडा अगदी पीठ इडली पात्रात घालायच्या वेळीच घालावा.)

- ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करून घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होऊ द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
- 10 ते 15 मिनिटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनिटांनी पात्र बाहेर काढावे. इडली ढोकळा जरा गार झाला कि पात्रातून काढून त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी आणि कोथिंबीर घालावी.

#

मेथीचे मुठीये

कुणीसं म्हटलं आहे, ``संसारासाठी किती हाल, कितीही खाव्या खस्ता, निघावे घरून सकाळी, करून भरपेट नाश्ता.`` खरं सांगू का, हे कुणीसं वगैरे काही नाही, मीच आत्ता म्हटलंय. पण पु.ल. म्हणतात, तसं आपल्याकडे काय म्हटलंय याच्यापेक्षा कुणी म्हटलंय, याला जास्त महत्त्व असल्यामुळे काय म्हटलंय, याच्यापेक्षा कुणी म्हटलंय कळल्याशिवाय कान टवकारले जात नाहीत. आता इंटरनेट वाचकांच्या शब्दांत सांगायचं, तर डोळे विस्फारले जात नाहीत, असं म्हणायला हवं. तर मंडळी, आज आपण नाश्त्याचा एक वेगळा पदार्थ माहिती करून घेऊया. मेथीचे मुठीये. मेथी म्हटल्यावर लगेच नाकं मुरडण्याची गरज नाही. हा पदार्थ खरंच चविष्ट आणि रुचकर आहे. मेथी हा काही फार उत्साहानं खाण्यासारखा किंबहुना चर्चा करण्यासारखा प्रकार नाही, हे मान्य, पण तसं तर अंघोळसुद्धा करण्याचा आपल्याला रोज कुठे उत्साह असतो? लोकलज्जा म्हणा, औपचारिकता म्हणा किंवा दिनक्रमाचा एक भाग म्हणूनसुद्धा अंघोळ करणारे काही महाभाग असतातच की! तर, मेथीची भाजी हा असाच एक कमी पसंतीचा प्रकार असला, तरी तो अतिशय औषधी आणि शरीलाला उपायकारकही आहे. प्रथिनं (प्रोटीन्स), फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह, असे काही हितकारक घटक असतात. सौंदर्य वाढवणं, प्रकृती उत्तम ठेवणं, रक्त शुद्ध करणं, अशी कामंही मेथी करू शकते. आता ती आपल्यासाठी एवढं करत असेल, तर आपण तिच्याकडे अगदीच पाठ तरी कशाला फिरवायची? मेथीचे पराठे तर लोकप्रिय आहेतच. आज शिकूया मेथीचे मुठीये करण्याची पाककृती. मुठीतून साकारला जाणारा पदार्थ म्हणून ह्याचं नाव `मुठीये.`

साहित्यः
1 मध्यम आकाराची मेथीची जुडी, अर्धी वाटी रवा, 1 वाटी डाळीचे पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.


कृतीः
मेथीची फक्त पानं घेऊन ती धुवून घ्यावीत. ती पानं कोरडी होऊ द्यावीत. नंतर त्यात रवा, डाळीचे पीठ, कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट, मीठ, हिंग घालावे. पीठ घट्ट भिजवावे. कढईत तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापले की त्यात भिजवलेले पीठ हातात घेऊन त्याची मूठ वळवावी आणि तो मुटका (हाताच्या मुठीत तयार झालेला गोळा) तेलात सोडावा. चांगला खरपूस तळावा आणि गरमागरम खायला द्यावा.

#

मसाला पोहे

कुणाचंही हृदय जिंकून घेण्यासाठीचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. खरंतर पोटाच्या आधी हा मार्ग जिभेच्या वाटेनं जातो आणि त्या पहारेकऱ्यानं पदार्थाच्या चवीला मान्यता दिली नाही, तर अन्नाचा एक कणसुद्धा आपल्या घशाच्या निमुळत्या खिंडीतून खाली उतरू शकत नाही.

खायला कुणाला आवडत नाही? उदरभरण ही खाण्याची मूळ गरज असली, तरी पोटाच्या चोचल्यांपेक्षा जिभेचे चोचलेच अनेकदा वरचढ ठरतात. म्हणून आज माणसाच्या खाद्यसंस्कृतीची कंदमुळांपासून बर्गर-पिझ्झा-पास्तापर्यंत उत्क्रांती झाली आहे. `जे जे उत्तम, उदात्त, उत्कृष्ट, महन्मधुरच नव्हे, तर तिखटजाळ आणि आंबटचिंबट ते ते` सगळं आपल्याला आवडतं. अट एकच. आपल्या जीभ नावाच्या सेन्सॉर बोर्डानं त्याला मान्यता द्यायला हवी!

 

रुचकर, चविष्ट खायला मिळण्यासाठी मुळात ते कुणालातरी करता यायला हवं. खाण्याएवढीच मजा उत्तमरीत्या तो पदार्थ बनवण्यातही असते. खूप कष्ट घेऊन, जीव ओतून केलेला एखादा पदार्थ चाखताना आपली माणसं मॅनर्स वगैरे धाब्यावर बसवून बोटं चाटायचा मोह आवरू शकत नाहीत, तेव्हा तो पदार्थ केल्याचं खरं समाधान मिळतं. अशीच खायची आणि खिलवण्याचीही आवड असलेल्यांसाठी काही आवडीच्या, काही माहितीच्या, काही माहिती नसलेल्या पदार्थांची मेजवानी. ह्यातला पदार्थ आवडला, तर लगेच करून बघायचा आणि अभिप्राय पाठवायचा. नाही आवडला, तर तो सोडून दुसरा करून बघायचा आणि अभिप्राय पाठवायचा. मग, करूया सुरू, ही `खान`देशयात्रा?

 

स्वयंपाक करायला शिकणारा प्रत्येक मराठी माणूस पहिल्यांदा कुठला पदार्थ करायला शिकला, असा सर्व्हे घेतला गेला, तर नक्कीच उत्तर मिळेल, ते म्हणजे कांदेपोहे. प्रत्येक घरात, सर्वाधिक वेळा तयार होणाऱ्या पदार्थांच्या यादीत कांद्यापोह्याला दुसरा कुणी स्पर्धक नसेल. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची अगदी सोपी पाककृती आणि कमीत कमी साहित्य आणि वेळ. खरंतर कांदा आणि पोहे, एवढ्या दोनच मूळ साहित्यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ असला, तरी त्याचं वैविध्य आणि चवींचे प्रकार एवढे आहेत, की बास्स! तांदळापासून बनवले जाणारे पोहे प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध असणं, हेही या पदार्थाच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण.


 

अचानक पाहुणे आल्यानंतर किंवा दर प्रत्येक घरात आठवड्यातून किमान दोनदा हा पदार्थ बनवला जातोच! कमी खर्चिक तर आहेच, पण बनवायला अगदी सोपा आणि कमी वेळ घेणारा. त्यातून सगळ्यांच्या आवडीचा. म्हणूनच लग्नासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात अगदी आवर्जून हा पदार्थ केला जातो आणि त्यावरूनच त्या सोहळ्याचंही `कांद्यापोह्याचा कार्यक्रम` असं बारसं झालंय. हे खरं कांद्यापोह्याचं माहात्म्य. कांद्याऐवजी बटाटा, टोमॅटो, किंवा वांगं, शेंगदाण्यांऐवजी मटार, मिरचीऐवजी लाल तिखट, असं साहित्य घालूनही पोहे केले जातात. या वेळी देतोय, मसाला पोह्यांची कृती. घरी करून बघा आणि आम्हाला कळवा!

 

साहित्यः

4 मूठ जाड पोहे, 1 मध्यम कांदा, 2 मध्यम आकाराची वांगी, गरम मसाला (चवीनुसार), लाल तिखट, फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हळद, 5-6 कढीपत्ता पाने, तेल, चवीपुरते मीठ, 1 लहान चमचा साखर, लिंबू, वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ


कृतीः

जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले की त्याला थोडे मीठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा, वांग्याच्या फोडी कराव्यात.
- कढईत तेल गरम करावे. त्यात त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावा. कांदा घालावा, तांबूस होईस्तोवर परतून घ्यावा. वांग्याच्या फोडी घालाव्यात चांगल्या शिजू द्याव्यात.
- कांदा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या की त्यात हळद, तिखट आणि गरम किंवा गोडा मसाला घालावा. भिजवलेले पोहे घालावेत. आणि डावाने निट मिक्स करावे. तेल आणि परतलेला साहित्य सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनिटे वाफ काढावी.
सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा.
(आपल्या आवडीचा कोणाताही मसाला वापरून पोहे करता येतील.)


#