Thursday, November 3, 2016

मसाला पोहे

कुणाचंही हृदय जिंकून घेण्यासाठीचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. खरंतर पोटाच्या आधी हा मार्ग जिभेच्या वाटेनं जातो आणि त्या पहारेकऱ्यानं पदार्थाच्या चवीला मान्यता दिली नाही, तर अन्नाचा एक कणसुद्धा आपल्या घशाच्या निमुळत्या खिंडीतून खाली उतरू शकत नाही.

खायला कुणाला आवडत नाही? उदरभरण ही खाण्याची मूळ गरज असली, तरी पोटाच्या चोचल्यांपेक्षा जिभेचे चोचलेच अनेकदा वरचढ ठरतात. म्हणून आज माणसाच्या खाद्यसंस्कृतीची कंदमुळांपासून बर्गर-पिझ्झा-पास्तापर्यंत उत्क्रांती झाली आहे. `जे जे उत्तम, उदात्त, उत्कृष्ट, महन्मधुरच नव्हे, तर तिखटजाळ आणि आंबटचिंबट ते ते` सगळं आपल्याला आवडतं. अट एकच. आपल्या जीभ नावाच्या सेन्सॉर बोर्डानं त्याला मान्यता द्यायला हवी!

 

रुचकर, चविष्ट खायला मिळण्यासाठी मुळात ते कुणालातरी करता यायला हवं. खाण्याएवढीच मजा उत्तमरीत्या तो पदार्थ बनवण्यातही असते. खूप कष्ट घेऊन, जीव ओतून केलेला एखादा पदार्थ चाखताना आपली माणसं मॅनर्स वगैरे धाब्यावर बसवून बोटं चाटायचा मोह आवरू शकत नाहीत, तेव्हा तो पदार्थ केल्याचं खरं समाधान मिळतं. अशीच खायची आणि खिलवण्याचीही आवड असलेल्यांसाठी काही आवडीच्या, काही माहितीच्या, काही माहिती नसलेल्या पदार्थांची मेजवानी. ह्यातला पदार्थ आवडला, तर लगेच करून बघायचा आणि अभिप्राय पाठवायचा. नाही आवडला, तर तो सोडून दुसरा करून बघायचा आणि अभिप्राय पाठवायचा. मग, करूया सुरू, ही `खान`देशयात्रा?

 

स्वयंपाक करायला शिकणारा प्रत्येक मराठी माणूस पहिल्यांदा कुठला पदार्थ करायला शिकला, असा सर्व्हे घेतला गेला, तर नक्कीच उत्तर मिळेल, ते म्हणजे कांदेपोहे. प्रत्येक घरात, सर्वाधिक वेळा तयार होणाऱ्या पदार्थांच्या यादीत कांद्यापोह्याला दुसरा कुणी स्पर्धक नसेल. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची अगदी सोपी पाककृती आणि कमीत कमी साहित्य आणि वेळ. खरंतर कांदा आणि पोहे, एवढ्या दोनच मूळ साहित्यांपासून बनवला जाणारा हा पदार्थ असला, तरी त्याचं वैविध्य आणि चवींचे प्रकार एवढे आहेत, की बास्स! तांदळापासून बनवले जाणारे पोहे प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध असणं, हेही या पदार्थाच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण.


 

अचानक पाहुणे आल्यानंतर किंवा दर प्रत्येक घरात आठवड्यातून किमान दोनदा हा पदार्थ बनवला जातोच! कमी खर्चिक तर आहेच, पण बनवायला अगदी सोपा आणि कमी वेळ घेणारा. त्यातून सगळ्यांच्या आवडीचा. म्हणूनच लग्नासाठी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात अगदी आवर्जून हा पदार्थ केला जातो आणि त्यावरूनच त्या सोहळ्याचंही `कांद्यापोह्याचा कार्यक्रम` असं बारसं झालंय. हे खरं कांद्यापोह्याचं माहात्म्य. कांद्याऐवजी बटाटा, टोमॅटो, किंवा वांगं, शेंगदाण्यांऐवजी मटार, मिरचीऐवजी लाल तिखट, असं साहित्य घालूनही पोहे केले जातात. या वेळी देतोय, मसाला पोह्यांची कृती. घरी करून बघा आणि आम्हाला कळवा!

 

साहित्यः

4 मूठ जाड पोहे, 1 मध्यम कांदा, 2 मध्यम आकाराची वांगी, गरम मसाला (चवीनुसार), लाल तिखट, फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हळद, 5-6 कढीपत्ता पाने, तेल, चवीपुरते मीठ, 1 लहान चमचा साखर, लिंबू, वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ


कृतीः

जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले की त्याला थोडे मीठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा, वांग्याच्या फोडी कराव्यात.
- कढईत तेल गरम करावे. त्यात त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावा. कांदा घालावा, तांबूस होईस्तोवर परतून घ्यावा. वांग्याच्या फोडी घालाव्यात चांगल्या शिजू द्याव्यात.
- कांदा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या की त्यात हळद, तिखट आणि गरम किंवा गोडा मसाला घालावा. भिजवलेले पोहे घालावेत. आणि डावाने निट मिक्स करावे. तेल आणि परतलेला साहित्य सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनिटे वाफ काढावी.
सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा.
(आपल्या आवडीचा कोणाताही मसाला वापरून पोहे करता येतील.)


#

No comments:

Post a Comment